Saturday, October 31, 2015

सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जानिर्मिती यंत्रणा (नेट-मीटरिंग)

नुकतेच महाराष्ट्र सरकारने 10 सप्टेंबर 2015 रोजी एक छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा‘ याविषयी ऊर्जाविषयक धोरण (धोरण) प्रसिद्ध केले आहे. अत्यंत आकर्षक असे हे धोरण छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा‘ वरदान ठरेल. कुणीही ग्राहक जो स्थानिक ऊर्जा वितरण कंपनीचा ग्राहक आहे, तो यात भाग घेऊ शकतो. व्यक्ती, संस्था, छोटा उद्योग, औद्योगिक कारखाना वा एखादी गृहरचना संस्था, हे सर्व जण त्यांच्या असलेल्या मंजूर क्षमतेची सौर "फोटोव्होल्टाईक ऊर्जा यंत्रणा‘ त्यांच्या मालकीच्या छतावर जागेत लावून त्यामधून निर्माण झालेली वीज स्वतःच्या वापरासाठी आणि जास्तीची शिल्लक ऊर्जा संबंधित वीज वितरण कंपनीला देऊ शकतो. यासाठीची जी यंत्रणा बसविली जाते तिला नेट-मीटरिंग असे म्हणतात. या "नेट मीटरिंग‘ चे मुख्य कार्य हे सौरऊर्जेवरील यंत्रणेद्वारे घेतलेली वीज आणि वीज वितरण कंपनीकडून वापरण्यात आलेली वीज याचा तपशीलवार हिशेब ठेवण्यासाठी होते.

छतावरील सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जानिर्मिती यंत्रणा प्रामुख्याने तीन प्रकारांत येतात.
    1)"ऑफ ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा.
    2) "ऑन ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा.
    3) “ऑन ग्रीड विथ बॅटरी बॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसताना ही आणि वीज असतानाही चालणारी यंत्रणा.

ऑफ ग्रीड म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा. (प्रतिमा १)

(प्रतिमा १)
या यंत्रणेमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून गरजेनुसार वापरता येते. यामध्ये दिवसभरातील लागणाऱ्या ऊर्जेचा वापरही बॅटरीद्वारेच होतो आणि शिल्लक ऊर्जा हीसुद्धा बॅटरीमध्येच साठविली जाते. वीज नसतानासुद्धा बॅटरीमध्ये साठविलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या विजेच्या गरजा भागविता येतात हा या यंत्रणेचा मोठा फायदा असतो. यामधील बॅटरीज या सौरऊर्जा उपलब्ध नसताना नित्याच्या विजेच्या साह्यानेसुद्धा चार्ज करता येतात. यामध्ये वीज वितरण कंपनीला देता येणारी वीज ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. कारण बॅटरीमध्ये साठवून ठेवलेली ऊर्जा ही नेट मीटरिंग पद्धतीने देता येत नाही. ही यंत्रणा तुलनेने थोडी महाग असते.

"ऑन ग्रीड‘ यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा. (प्रतिमा २)

(प्रतिमा २)
सौरऊर्जेवर तयार होणारी वीज आणि नेहमीची वीज एकत्रितपणे सलग वापरता येते आणि तिचा संयुक्त वापर थांबल्यावर तयार होणारी; पण न वापरली जाणारी शिल्लक ऊर्जा वितरण कंपनीला देण्याची प्रक्रिया चालू होते. यामध्ये नेहमीची वीज नसेल, तर मात्र आपल्या स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी या ऊर्जेचे निर्माण होण्याची प्रक्रिया कामी येत नाही. एकंदर गरजांचे सुयोग्य मूल्यमापन करून योग्य क्षमतेची यंत्रणा आस्थापित करून घेतल्यास रात्री वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची आगाऊ निर्मिती दिवसा करून आणि ती वीज वितरण कंपनीला देऊन त्या दिलेल्या ऊर्जेच्या बदल्यात रात्री आपल्या गरजा भागविण्यासाठी वीजवापर करता येतो. कारण विजेच्या बदल्यात वीज हे समीकरणच आहे या नेट मीटरिंग यंत्रणेचे.

“ऑन ग्रीड विथ बॅटरी बॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही आणि वीज असतानाही चालणारी यंत्रणा. (प्रतिमा ३)

(प्रतिमा ३)
ही यंत्रणा म्हणजे वरील दोन्ही यंत्रणांचा समन्वय. यामध्ये सौरऊर्जेवर तयार होत असलेल्या ऊर्जेतून लागणारी ऊर्जा वापरता येते. वापरत असताना यंत्रणेबरोबर आलेल्या बॅटरीमध्ये साठवता येते आणि त्यानंतर शिल्लक राहणारी ऊर्जा वीज वितरण कंपनीला देता येते.

अशा या दोन प्रकारच्या यंत्रणा नेट मीटरिंग पद्धतीची सुयोग्य सांगड घालून वापरता येतात. वीज वितरण कंपनीच्या याबाबतच्या अटी आणि शर्ती या प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या आहेत आणि त्याबाबतचे स्पष्ट धोरण महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या राज्य शासनाच्या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये खासगी, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी अनुदानाची तरतूद नाही. या यंत्रणेसाठी गृह कर्जाशी संलग्न कमी दराचे कर्ज देण्याची तरतूद आहे. तसेच कर सवलतीच्या माध्यमातून होणारी बचत आणि वीज कंपनीने वीज विकत घेण्यासाठी केलेला करार हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल ठरेल.

अधिक माहिती हवी असल्यास (सौर उर्जा माहिती) टिचकी मारा.