Monday, January 4, 2016

विविध जिल्हातून वर्तमान पत्रातून आलेल्या बातम्या

विविध जिल्हातून वर्तमान पत्रातून आलेल्या बातम्या  


माझा प्रवास - सौरऊर्जेचा प्रसार आणि प्रचार

माझा प्रवास 
       उपक्रम पूर्ण करण्याच्या नादात दैंनदिन प्रवास करताना आलेले अनुभव जे पहिले, जे वाटले त्याचे साध्या सुध्या शब्दात केलेले वर्णन करीत आहे, त्यात अलंकारिक भाषा नाही, सोबत असलेल्या व मदत केलेल्या मंडळींचा उल्लेख अतिशय थोडक्या शब्दात मांडत आहे.

       अपुऱ्या वि‍जेच्या संकटापासून वाचण्यासाठी जग भर चालू असलेल्या चळवळीत, पर्यावरणास पूरक अशा साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमाणात निर्मिती व्हावी या उद्देशानेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा वापर शासकीय कार्यालयात करावा यासाठी प्रचार व प्रसार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांस माझ्या रॉयल एम्फिल्ड बुलेट क्लासिक ३५० या मोटारसायकलवरून भेट देऊन शासकीय कार्यालय आणि त्याच्या संलग्न संस्थेत सौरऊर्जेचा वापर व्हावा यासाठी प्रसार आणि प्रचाराचे काम करायचे, असा निर्णय मी ऑक्टोबर महिन्यात घेतला होता.

      मोटार सायकलीवरून जायचे तर सोबत कुणाचीतरी हवी म्हणून मी संतोष विचारले, तो लगेच हो म्हणाला, मी लगेच नियोजनाला लागलो, पूर्वी नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात काम करण्याचा आणि पूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा अनुभव माझ्याकडे होताच. प्रत्येक जिल्हा स्तरावर पुष्कळ मित्रपरिवार असल्याने मला नियोजन करण्यात बिलकुल अडचण वाटत नव्हती. प्रवासाचे नियोजन हिवाळ्यात करायचे असे मी ठरवले. सुरवातीला प्रवास प्रारंभाचा दिवस ठरला होता ३० नोव्हेंबर, कारण त्यादिवशी सोमवार होता त्यामुळे आठवड्याचे नियोजन आम्हाला करता येईल असे वाटले, पण नियोजन करताना माझ्या मुलीचा वाढदिवस ३० नोव्हेंबरला आहे, हे विसरलो होतो, पण पत्नीने आठवून दिल्याने मी माझ्या उपक्रमाची सुरुवात १ डिसेंबरला करू असे ठरविले.

मूळ अडचण होती मला कामावरून एक महिन्याची सुट्टीची मिळेल? का नाही? याची पण मी सुट्टी मागितली व कार्यालयाने मला माझी रजा मंजूरही केली, या उपक्रमास माझ्या संपुर्ण कुटुंबाकडुनही प्रोत्साहन मिळत होते. माझे आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी विशाखा, माझ्या मुली सुरभि आणि स्वानंदि यांनी माझ्या या उपक्रमास पाठिंबा दिला. सर्व काही यथासांग जुळून आले होते. 
निघण्याची तारीख अंतिम करण्यात आली होती, नियोजन कसे करायचे मार्गक्रम कसा असेल याचा अभ्यास करायला लागलो. पूर्ण अनेक वेळा महाराष्ट्र फिरण्याचा अनुभव होताच त्यामुळे शासकीय सुट्ट्या, जिल्हा स्तरावरील मित्रांची उपलब्धता, गुगल मॅप, नकाशांचा अभ्यास करुन करुन मी प्रवासाचा मार्गक्रम ठरविला. 

१ तारखेला पुण्यातून निघून सातारा जिल्ह्यातून सुरुवात करायची असे ठरवले. 

१ डिसेंबर रोजी सातारा व सांगली, २ डिसेंबरला कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ३ डिसेंबरला रत्नागिरी, ४ डिसेंबरला अलिबाग, ठाणे, ५ डिसेंबरला पालघर, नाशिक, ७ डिसेंबरला धुळे, नंदुरबार, ८ डिसेंबरला जळगाव, ९ डिसेंबरला बुलढाणा व अकोला, १० डिसेंबर अमरावती, वर्धा, ११ डिसेंबर नागपूर व भंडारा, १४ डिसेंबर गोंदिया व गडचिरोली,१५ डिसेंबर चंद्रपूर, १६ डिसेंबर यवतमाळ व वाशीम, १७ डिसेंबर हिंगोली, १८ डिसेंबर नांदेड, १९ डिसेंबर लातूर व उस्मानाबाद, २१ डिसेंबर सोलापूर, २२ डिसेंबर बीड व परभणी, २३ डिसेंबर जालना, २८ डिसेंबर औरंगाबाद व अहमदनगर,३० डिसेंबरला आमच्या मोहिमेची सांगता पुणे जिल्हा मुख्यालयास भेट देऊन करण्याचे नियोजन केले. साधारणतः एकूण ५५०० किलोमीटर प्रवास होईल असा अंदाज बांधला गेला.
नियोजन वेळेत पूर्ण होईल का? हे शक्य नाही? अशा उपक्रमातून काहीही साध्य होणार नाही! अनावश्यक खटाटोप आहे! जिल्हांना खरंच भेटी देणार का? यापूर्वी आम्ही असे प्रयोग केले होते पण काहीही फायदा झाला नाही, असे अनेक शंका/प्रश्न उपस्थित करणारे मला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत होते.
नियोजन पूर्ण झाले, Facebook, Whats app, Blog सारख्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सदर उपक्रमाचे वेळेसहित नियोजन प्रसिद्धी केले. जिल्हा स्तरावरील मित्र परिवाराला फोन करुन नियोजनाची माहिती दिली व जिल्हास्तरावर आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.  

          एकूण ५५०० किलोमीटर प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, लोकांशी प्रत्यक्ष, भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र/आवृत्ती यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत व माझ्या उपक्रमाबद्दल प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याचा संकल्प नियोजनात केला होता. काही उत्तम विधायक व समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत होते. पेपरमध्ये बातम्या छापून यायला लागल्या होत्या त्यामुळे आम्ही उत्साहात होतो. असा समाजोपयोगी काम करुन आपण काहीतरी भन्नाट करत आहोत याची जाणीव होत होती.
कसं होईल? काय होईल? शासकीय कार्यालयातून प्रतिसाद कसा मिळेल? ही धास्ती मनामध्ये होतीच पण जिद्द केली होती की, काहीही झाले तरी हा उपक्रम पूर्ण करायचाच. 

प्रवासाचे नियोजन, प्रसिद्धी झाली होती, माझ्याकडून जिल्हास्तरावरील माझ्या मित्रांचे त्या त्या जिल्हात नियोजन झाल्याचे समजत होते, राज्यात वर्तमान पत्रात बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या, अपेक्षांच ओझं वाढत चालल होत, त्याच मनावर प्रचंड दडपण येत होत. 

      आता तयारी करायची होती बॅग भरायची, अगोदरच आम्ही पुण्यातून बुलेटला साजेल अशी मिलिटरी टायपची बॅग घेतली होती. ती बॅग मागील शीटवर व्यवस्थित फीट होते, आणि मागील व्यक्तीला बसायलाही त्रास होत नाही, बॅगेत काय काय घ्यायचे याची यादी तयार करुन १५ दिवसांपासूनच साहित्यांची जमवाजमव सुरु केली होती, एकंदरीत प्रवासा दरम्यान सुट्टी केंव्हा येणार आहे?, केंव्हा आपल्याला कपडे धुता येणार आहे?, त्या दृष्टीने कपडे घ्यायचे, अंघोळीचे साबण, कपड्याचा साबण व इतर आवश्यक बाबी.        

      प्रवासात कोणत्या गोष्टी करायच्या, करायच्या नाही काय सावधगिरी बाळगायची याची नियमावलीच मी तयार केली होती, जसे की हेल्मेट, जर्किन, गॉगल घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही, गाडीचा स्पीड जास्तीस जास्त ताशी ८० ते ९० किलोमीटर वर काटा जाऊन द्यायचा नाही, सकाळीच नाष्टा करुन प्रवासास सुरुवात करायची, पिण्याला अति थंड पाणी टाळायचे, शक्यतो बंद बाटलीतले पाणी प्यायचे, प्रवासात मांसाहार वर्ज करायचा जेवण शक्यतो कामी व हलकेच करायचे, गाडीवर असताना मोबाईलवर बोलणे टाळणे, साधारणतः ८० ते १०० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर थोडावेळ थांबून चहा घेऊन पुन्हा मार्गस्थ व्हायचे, शक्यतो उजेड असे पर्यंतच गाडी चालवायची अंधार पडायला लागला, की जवळ असलेल्या तालुका स्तरावर अरामाकरिता निवारा शोधायचा आणि मुक्काम करायचा, रोज सकाळी व संध्याकाळी घरी फोन करुन प्रवासाची व सुखरूप असल्याची वार्ता द्यायची, दिवस भराचा झालेला खर्च लिहून काढणे ई.

(दि.१, मंगळवार) १ डिसेंबरला सकाळी ८ वाजता प्रवासास सुरुवात केली साधारणतः ११ वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पोहचलो. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. दुपारी २ वाजता साताऱ्यातून आम्ही सांगलीकडे रवाना झालो, ५.३०  वाजता सांगलीत जिल्हाअधिकाऱ्यांची भेट घेतली व मुक्काम सांगलीमध्ये करायचे ठरवले. आज दिवसभरात आम्ही सातारा आणि सांगलीच्या जिल्हाधिकार्यांाना भेटून निवेदन दिले होते प्रत्यक्ष भेटही झाली होती, त्यांना सौरऊर्जेचे महत्त्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जिल्हातील ज्या ग्रामपंचायती सधन आहेत. ज्या गावांचे उत्पन्न १० लाखांच्या पुढे आहे, अशा ग्रामपंचायतींना सौर ऊर्जेचा वापर करणे शक्य आहे का?. याची माहिती घेण्यास सुरुवात केली. पहिल्याच भेटीत खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आपण करीत असलेल्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून आमच्या उत्साहाला पारावार उरला नाही. पहिल्याच दिवशी आमचा २७५ किलोमीटर प्रवास झाला होता. 

(दि.२, बुधवार) सांगलीतून सकाळी ८ वाजता नाष्टा करुन कोल्हापूरकडे रवाना झालो, कोल्हापूरमध्ये अधिकाऱ्यांशी भेट घेऊन आम्ही दुपारी १ वाजता सिंधुदुर्गच्या बाजूने कुच केली, आंबोली घाटातून जाताना निसर्ग सौंदर्य पाहत पाहत सायंकाळी ५ वाजता ओरसला पोहचलो, कार्यालये बंद होण्याच्या बेतातच होती, धावत पळत जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद कार्यालयास भेट देऊन ओरसला मुक्काम करायचं ठरवलं. ओरसमध्येच  भक्तीनिवास मध्ये थांबलो. या दिवशी आमचा २२० किलोमीटर प्रवास झाला होता.

(दि.३, गुरुवार) तिसऱ्या दिवशी पहाटे लवकर उरकून ७ वाजताच आम्ही रत्नगिरीच्या बाजूनी निघालो, वाटेतच कुडाळ मध्ये चहा नाष्टा केला आणि पुढे निघालो, आडिवरे पावस मार्गे साधारणतः २०० किलोमीटरचा प्रवास करुन आम्ही रत्नागिरीला साधारणतः दुपारी १२ वाजता पोहचलो. मुंबई गोवा महामार्ग सोडल्यावर आडिवरे पावस मार्गे जाताना रस्त्याचे चढ उतार, भयाण शांतता आमच्याशिवाय एकही गाडी दिसत नव्हती, रस्तातर चुकलो नाही ना? हे विचारायला मानस पण दिसत नव्हती.  कसं तरी आडिवरे मध्ये आल्यावर स्थानिक लोकांकडून पुढच्या रस्त्याचा मार्ग समजून घेतला, कोकणातली रस्ते नागमोडी, छोटे छोटे घाट, समुद्र किनाऱ्यावरून जाताना, आंब्याच्या वनातून जाताना आम्ही थोडा निवांतपणा म्हणून फोटो काढले. रत्नागिरीत अधिकाऱ्यांशी व पत्रकारांशी भेटून आम्ही दुपारी ३ वाजता अलिबागच्या बाजूने मार्गस्थ झालो. अलिबाग आणि रत्नागिरी अंतर जास्त होते म्हणून आम्ही रस्त्यातच तालुकाच्या ठिकाणी मुक्काम करायचे ठरवले खेडला किंवा महाडला मुक्काम करू असे ठरले, पण रात्री ८ वाजले होते आणि आम्ही महाडला थांबणार, तोच बायपास मार्गे महाड केंव्हा मागे गेलं समजलंच नाही, डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचे हेडलाईट चमकत होते, डोळ्यांवर प्रचंड ताण आला होता. प्रवास प्रचंड झाला होता, आज शेवट माणगावला मुक्काम केला. साधारण रत्नागिरी ते माणगाव १५० किलोमीटरचा प्रवास करुन माणगावला हॉटेल मध्ये शांत झोपलो. 

(दि.४, शुक्रवार) चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजता उरकून मुरुड मार्गे अलिबागच्या बाजूने प्रस्थान केले. ८० किलोमीटर प्रवास केल्यानंतर सकाळी १० वाजता रायगड जिल्हाचे मुख्यालय असलेल्या अलिबाग या शहरात पोहचलो, शासकीय अधिकारी उपलब्द नसल्यामुळे फक्त निवेदन कार्यालयात जमा करुन ११ वाजता ठाण्याकडे निघालो १०० किलोमीटर प्रवास झाल्यानंतर दुपारी २ वाजता ठाण्यात पोहचलो, तासाभरात काम उरकून पालघरच्या दिशेने रवाना झालो. ६ वाजता पालघरला पोहचलो कार्यालये बंद होण्याच्या स्थितीत होती तश्याचे निवेदने जमा केली आणि मुक्काम कोठे करायच्या या विवंचनेत होतो, शेवट संतोष आणि मी चर्चाकरून नाशिकला जाऊन मुक्काम करायचे ठरवले अंतर खूप होते कारण ३५०-३७५ किलोमीटर अगोदरच प्रवास झाला होता. साधारण १६० किलोमीटर अंतर पार करायचा निर्णय आम्ही घेतला आणि नाशिक मध्ये मित्रांना फोन करुन हॉटेल बुक करायला सांगितले, हॉटेल तर बुक झाले होते त्यामुळे नाशिकलाच जावे लागणार होते.  त्यादिवशी आमचे सर्वाधिक प्रवास झाला ५०० ते ५५० किलोमीटर प्रवास करुन आम्ही रात्री ११.३० ला नाशिक मध्ये दाखल झालो, पाय प्रचंड दुखायला लागले होते. जेवण करुन झोप केंव्हा लागली काही समजलेच नाही. आज दिवसभर आम्ही साधारणपणे ५०० किलोमीटर प्रवास झाल्याने बसल्या जागी आम्ही मागे पुढे होत होतो अस वाटत होत, जस की, आम्ही गाडीवरच बसलो आहे.

(दि.५, शनिवार) पाचव्या दिवशी नाशिकमध्ये १०.०० वाजता उरकून बरोबर सकाळीच १०.३० ला मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि जिल्हा परिषदेत आवक विभागात त्यांचे निवेदन जमा केले. पत्रकारांशी चर्चा करुन १२ वाजता धुळ्याकडे प्रस्थान केले. राष्ट्रीय महामार्ग ३ असल्यामुळे आम्ही धुळ्याला अक्षरशः १६० किलोमीटरचे अंतर २.१५ तासात पार केले. धुळे जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन मी नंदुरबारला प्रस्थान केले ११० किलोमीटर प्रवास करुन संध्याकाळी ६ वाजता पोहचून निवेदन शासकीय कार्यालयात जमा केले आणि मुक्काम नंदुरबार मध्येचं केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २६० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.६ रविवार) सहाव्या दिवशी रविवार असल्यामुळे निवांत ११.०० वाजता उठून दोनडायचा, सिंदखेडा अमळनेर, धरणगाव मार्गे जळगावकडे प्रस्थान केले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहचलो आणि आराम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे १५० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.७, सोमवार) सातव्या दिवशी १०.०० जिल्हाधिकारी कार्यालयकडे गेलो लोकशाही दिन असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खूप गर्दी होती, बऱ्याच वेळानंतर आमची प्रतीक्षा संपली आणि मा. जिल्हाधिकारी यांची भेट होऊन निवेदन सादर केले. इकडे श्री. अरुण कोष्टी यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलाविली होती, स्थानिक नगरसेवकांना बोलवुन माझा सत्कार करण्याचे आयोजिले होते. छोटेखानी सत्कार व पत्रकारांना मी करीत असलेल्या उपक्रमाबद्दल व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन आम्ही जिल्हा परिषदेकडे जाऊन निवेदन सादर केले. अरुणनी जळगावचे लोकप्रिय वांग्याचे भरीत व भाकरीची शिदोरी दिली वा आम्ही आमच्या पुढील वाटचालीस सुरुवात केली सर्व कार्यक्रम होता होता जळगाव सोडायला दुपारी ४ वाजले तिथून आम्ही बुलढाण्याकडे मार्गस्थ झालो. भुसावळ, मलकापूर मार्गे सायंकाळी ८ वाजता बुलढाण्यात पोहचलो हॉटेलमध्ये जाऊन विश्राम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे १७० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.८, मंगळवार) आठव्या दिवशी सकाळी बुलढाणा जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी १२ वाजता बोथा जंगलातून खामगाव मार्गे अकोल्याकडे निघालो, जंगलातून जाताना प्राण्यांपासून सावध राहा असे फलक दिसत होते, अक्षरशः रस्त्यावर कोणीच नव्हते, रस्ता चांगला होता, क्वचितच जंगल कर्मचारी दिसायचे, हा रस्ता रात्री ९ वाजता बंद केला जातो आणि सकाळी ७ वाजता उघडतो, कारण रात्रीच्या वेळी रस्तावरून प्राण्यांची येजा चालू असते, जंगल सुरु झाले तेंव्हा गाडी रिझर्व्हला आली होती आणि पेट्रोल पंप साधारणतः ४० किलोमीटर खामगावला होते. भीती मनात होती की, पेट्रोल संपल्यावर काय करायचे? साधारणतः १० किलोमीटर पुढे गेल्यावर विचार मनात आला गाडी आम्ही पुन्हा बुलढाण्याच्या बाजूने फिरवली, जंगलाच्या चेक पोस्ट वर आल्यावर तिथे पेट्रोल पंप बद्दल विचारणा केली, सुदैवानं सुटे पेट्रोल एका हॉटेलमध्ये मिळत असल्याचे आम्हाला समजले, सुरुवातीस आम्हाला पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला पण आम्ही समजून सांगितल्यावर जास्त दराने १ लिटर पेट्रोल गाडीत ढकलले आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो आणि खामगावला येऊन पेट्रोल भरले. बुलढाणा अकोला साधारणपणे ११० किलोमीटर अंतर आहे, ४ वाजता अकोल्याला पोहचलो, अकोल्याला पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, पत्रकारांशी चर्चा केली आणि मुक्कामी मुर्तिजापूर मार्गे १०० किलोमिटर अमरावतीकडे रवाना झालो. अमरावतीमध्ये हॉटेल मध्ये आराम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २३० किलोमीटर प्रवास केला.   

(दि.९, बुधवार) नवव्या दिवशी सकाळी १०.३० ला मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांना भेटून त्यांच्याकडे निवेदन सादर केले.  तसेच जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, १२ वाजता अमरावती शहर सोडून आम्ही चांदूर रेल्वे, पुलगाव मार्गे १०० किलोमीटर वर्ध्याकडे निघालो. वर्ध्यामध्ये दुपारी ३ वाजता पोहोचलो जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर करुन आम्ही ६ वाजता मुक्कामी ८० किलोमीटर नागपूरच्या दिशेने रवाना झालो. नागपूरला जाऊन तिथे मुक्काम केला. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २०० किलोमीटर प्रवास झाला.

(दि.१०,गुरुवार) दहाव्या दिवशी सकाळी १०.३० ला मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांना भेटून त्यांच्याकडे निवेदन सादर केले.  तसेच जिल्हापरिषदेमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचेकडे निवेदन सादर केले, दुपारी १ वाजता नागपूर शहर सोडून आम्ही ७० किलोमीटर भंडाऱ्याकडे निघालो. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही दुपारी २.३० वाजता भंडाऱ्यात पोहोचलो जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर करुन आम्ही ५ वाजता मुक्कामी १०० किलोमीटर भंडाऱ्यातून गोंदियाच्या दिशेने रवाना झालो. आज दिवसभर आम्ही साधारणपणे १८० किलोमीटर प्रवास केला. गोंदियाच्या जवळच तिरोड्याला जाऊन तिथे मुक्काम केला.

(दि.११, शुक्रवार) अकराव्या दिवशी सकाळी ८ वाजता उरकून गोंदियाकडे प्रस्थान केले. नाष्टा करुन गोंदिया शहरात पोहचलो, तसेच मा. जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचेकडे निवेदन सादर केले, दुपारी १ वाजता गोंदिया शहर सोडून आम्ही सडक अर्जुनी, नवेगाव बांध, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज वडसा, आरमोरी मार्गाने साधारणतः १८० किलोमीटर गडचिरोलीकडे निघालो. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही सायंकाळी ५.३० गडचिरोलीला पोहोचलो मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर करुन गडचिरोलीमध्ये मुक्काम करायचे ठरविले. आज दिवसभर आम्ही साधारणपणे २५० किलोमीटर प्रवास केला.

(दि.१२, शनिवार) बाराव्या दिवशी आज महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने शासकीय सुट्टी असते म्हणून आम्ही आज आराम करायचे ठरविले. गेल्या १०,१२ दिवसांमध्ये केलेल्या धावपळीची उजळणी करायला लागलो, आणि मी माझी डायरी काढली आणि आणि प्रवास थोडक्यात लिहून काढला, नियोजनानुसार आम्ही एक दिवस अगोदर चाललो होतो. आज आम्ही गडचिरोली धरून २० जिल्ह्यात भेटी दिल्या होत्या, जिल्हास्तरावरून शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, जागोजागी मित्रांनी केलेली सोय, आम्ही पोहोचण्याच्या अगोदरच शहर सुरु होण्यापूर्वीच मित्र येऊन थांबलेले असत त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद शोधायला आमचा वेळ गेला नाही. मी यापूर्वी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालय कार्यालयांना पाच ते सहा वेळा भेटी दिल्या असल्याने बऱ्यापैकी शहरातील अंतर्गत रस्त्याची माहिती मला होती. विचार करता करता आम्ही राज्यातील २० जिल्ह्यांना भेटी दिल्या या विचारानाच मला खूप हायसं वाटलं होत.

(दि.१३, रविवार) तेराव्या दिवशी आज रविवार असल्याने शासकीय सुट्टी असते म्हणून आम्ही चंद्रपूरला जाऊन मुक्काम करायचे ठरविले. माझा मित्र सुशांत राच्चावार यानी त्याच्या घरी जेवणाचा बेत केला होता, सकाळीच जेवण करुन आम्ही दुपारी १२ वाजता आम्ही चंद्रपूरच्या दिशेने निघालो, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन निवासामध्ये रूम शिल्लक आहे का? याची चौकशी करुन ताडोब्याला जायचं नियोजन केले, रुमची उपलब्धता आहे हे समजल्यावर मूलच्या पुढे गेल्यावर कोळसा गेट फाटा आहे, त्या मार्गे जाण्याचे ठरले पण जाताना समजले की, दुचाकीला परवानगी नाही, म्हणून आम्ही परत माघारी फिरलो आणि साधारणतः ४ वाजता चंद्रपूरमध्ये दाखल झालो. आजचा मुक्काम आम्ही चंद्रपूरमध्ये करुन दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रपूरचे काम उरकून यवतमाळला जाण्याचे नियोजन केले होते.

(दि.१४, सोमवार) चौदाव्या दिवशी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी १२ वाजता चंद्रपूर शहर सोडून आम्ही घुग्गुस, वणी मार्गे १७० किलोमीटर यवतमाळकडे निघालो. चंद्रपूर वणी मार्गावर दगडी कोळश्याच्या जड वाहतुकीमुळे प्रचंड काळा धुरळा खराब रोड, एका ठिकाणी जोडमोहा या गावाच्या जवळ गेल्यावर हेल्मेटची काच वर असल्याने गाडी चालवत असताना अचानक एक मधमाशी माझ्या हेल्मेटमध्ये घुसली आणि माझ्या उजव्या डोळ्याच्या खाली डंख दिला मी ताबडतोब गाडी रोडच्या खाली घेतली, प्रचंड वेदना व्हायला लागल्या होत्या संतोषनी मधमाशीचा डंख काढला, मी तोंड पाण्याने धुतले पुढे जाऊन हॉटेलात चहा घेतला थोडावेळ थांबलो, आणि यवतमाळला ४.३० ला पोहचलो, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळमध्ये निवासी उप-जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि जिल्हापरिषदेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले, आजचा मुक्काम मी कारंजा लाड येथे करायचा ठरला, धारव्हामार्गे ९० किलोमीटर आम्ही कारंजा ला पोहोचलो, सुनील गुंडेला हॉटेलची रूम बुक करायला सांगितली होती, त्यामुळे रूम बुक झाली होती, कारंजा बस स्थानकावर पोहचल्यावर सुनील आम्हास हॉटेलकडे घेऊन आला आणि आम्ही जेवण करुन आराम केला व उद्याचे नियोजन वाशीम भेटीचे केले.
(दि.१५, मंगळवार) पंधराव्या दिवशी सकाळी ८.३० वाजता कारंज्यावरून निघालो ७० किलोमीटर वाशिमच्या दिशेने, जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी ११.३० वाजता वाशीम शहर सोडून आम्ही ७० किलोमीटर हिंगोलीकडे निघालो. खराब रोड हिंगोलीला २ वाजता पोहचलो, तासाभरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापरिषदेत निवेदन सादर केले, ९० किलोमीटर संध्याकाळी ५.३० ला आम्ही नांदेडमध्ये पोहोचलो. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले व परभणीत मुक्काम करुन आराम करायचे ठरवले.

(दि.१६, बुधवार) सोळाव्या दिवशी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी आणि जिल्हा परिषदेमध्ये निवेदन सादर केले, दुपारी १२ वाजता गंगाखेड, अहमदपूर चाकूर मार्गाने १५० किलोमीटर लातूरकडे रवाना झालो. अहमदपूर लातूर हा रस्ता इतका खराब होता की आम्ही रस्त्याने चाललोय का खड्ड्यातून तेच समजत नव्हते. ४ वाजता लातूरमध्ये दाखल होऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले. साधारणतः १४० किलोमीटरचा प्रवासकरुन तुळजापूरमार्गे सोलापूरला सायंकाळी ८ वाजता पोहोचलो.

(दि.१७, गुरुवार) सतराव्या दिवशी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, आतापर्यंत जवळजवळ ४३०० किलोमीटरचा आमचा प्रवास झाला होता. गाडी सर्विसिंगला आली होती, दुपारी १२ वाजता उस्मानाबादकडे रवाना झालो. सोलापूरमधून निघतानाच मी विकास मेटे याला रॉयल एम्फिल्डच्या सर्विस सेंटर नाव नोंदणी करण्यास सांगितले होते. २ वाजता उस्मानाबादमध्ये दाखल झालो तडक रॉयल एम्फिल्डच्या सर्विस सेंटरमध्ये गेलो आणि आमच्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन गाडी लवकरात लवकर तयार करुन ठेवण्यास विंनती केली, त्यांनीही एका तासात गाडी सर्विसिंग करुन देतो असे आश्वासित केले. दरम्यानच्या वेळेत मी विकासची मोटार सायकल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, पत्रकारांना भेटी दिल्या हे सर्व काम होईपर्यंत माझी गाडी सर्विसिंग तयार झाली होती.  मी विकासाकडे त्याची गाडी देऊन बीडकडे ५ वाजता मार्गस्थ झालो. सायंकाळी साधारणतः १२० किलोमीटर प्रवास करुन बीडमध्ये साधारणतः ७.४५ वाजता पोहचलो. बीडमध्ये गाड्या चोरीला जातात असे समजले, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलात पार्किंगची सोय नव्हती. गाडी रोडवरच हॉटेलसमोर लावणे होते. हॉटेलच्या व्यवस्थापकास विंनती केली की तुझ्याकडे लोखंडी साखळी असेल तर गाडी बांधून घे. त्यांनी सांगितले की रात्री ११.३० वाजता मी माझी व तुमची गाडी लोखंडी साखळीने बांधून घेतो. पण मला झोप येत नव्हती ११.३० ला मी परत हॉटेल व्यवस्थापकाकडे गेलो आणि त्याला गाडी लोखंडी साखळीने बांधण्याची आठवण करुन दिली. त्याने ११.४५ वाजता माझ्या समोर त्याची व माझी गाडी लोखंडी साखळीने बांधून घेतली मी त्याची खात्री करुन रूम मध्ये झोपायला गेलो. तेव्हा कुठे मला झोप लागली.

(दि.१८, शुक्रवार) अठराव्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले, आमचे मित्र श्री. मोमीन यांना भेटलो आणि १२ वाजता गेवराई अंबड मार्गे ११० किलोमीटर जालन्याच्या बाजूने रवाना झालो. मध्ये ढाब्यावर जेवण केले,  जालन्याला ४ वाजता पोहचलो निवासी उप-जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सदर केले, जिल्हापरिषद जालना मध्ये निवेदन दिले आणि ६ वाजता आम्ही ७० किलोमीटर औरंगाबादच्या वाटेला मार्गक्रमण केले. जालन्यातून निघताना मी राजेश पुरीला फोन केला, त्याने सांगितले की, उद्या औरंगाबादमध्ये खुलताबाद येथे यात्रा असल्याने औरंगाबाद जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. पण काहीही पर्याय नव्हता, साधारणपणे ८ वाजता आम्हाला औरंगाबाद बसस्थानकासमोर हॉटेल मिळाले आणि संध्याकाळी जेवण करुन विश्रांती केली. उद्या तर औरंगाबाद मध्ये सुट्टी होती करायचे काय? हा प्रश्न मनात होता. विचारांती उद्या अहमदनगरला जायचे आणि रविवारी पुन्हा औरंगाबादला यायचे नियोजन झाले.

(दि.१९, शनिवार) एकोणिसाव्या दिवशी सकाळी १० वाजता आम्ही १३० किलोमीटर अहमदनगरच्या बाजूने कुच केली, अहमदनगरला दुपारी १ वाजता पोहचलो निवासी उप-जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सदर केले, जिल्हापरिषद अहमदनगरमध्ये निवेदन दिले आणि ५ वाजता पुन्हा आम्ही माघारी औरंगाबादच्या बाजूने निघालो मध्ये नेवासात छोट्या हॉटेल मध्ये मुक्काम केला आणि औरंगाबाद पर्यटन स्थळ असल्याने आणि उद्या रविवार असल्याने औरंगाबाद मधेच काही पर्यटन स्थळांना भेटी देऊ असे ठरले. 

(दि. २०, रविवार) विसाव्या दिवशी सकाळी ८ वाजता नेवाश्यावरून औरंगाबादकडे निघालो. बीबीका मकबरा, पाण्याची चक्की, दौलताबादचा किल्ला, किल्यावर गेलो नाही. किल्याच्या खाली बगीच्यातच थोडावेळ फिरस्ती झाल्यावर सायंकाळी साधारणपणे ८ वाजता आम्हाला औरंगाबाद बसस्थानकासमोर ज्या हॉटेलमध्ये आम्ही पूर्वी थाबलो होतो तिथेच पुन्हा विश्रांती केली. उंची थोडी कामी असल्याने संतोषला गाडीवर बसायचे असेल किंवा उतरायचे असेल तर मला रस्त्यावर कुठे उंचवटा आहे का! हे पाहून गाडी थांबवावी लागत असे.

(दि. २१, सोमवार) एकाविशाव्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आणि जिल्हापरिषदेमध्ये निवेदन सादर केले आणि पुण्याच्या बाजूने मार्गस्थ झालो, १ वाजता आम्ही औरंगाबाद सोडले ४ वाजता अहमदनगरमध्ये थोडावेळ थांबून चहा घेतला  आणि पुण्याच्या बाजूने निघालो. रात्री साधारणतः ७ वाजता आम्ही आमच्या घरी पोहचलो होतो. जरी घरी पोहचलो होतो तरी मोहीम आमची अपूर्णच होती, आमचा ३४वा जिल्हा बाकी होता. पुणे

(दि. २८, सोमवार) २८ तारखेला सकाळी मी आणि संतोष जिल्हाधिकारी कार्यालयात गेलोपण जिल्हाधिकारी कार्यालय विधानभवन परिसरात स्थलांतरित झाले आहे असे समजले. तिथून मी विधानभवन मध्ये गेलो जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत होते जिल्हातील आमदार खासदार पालक मंत्री या बैठकीस उपस्थित होते. मी बैठक कक्षात जाऊन बसलो साधारण ४.३० वाजता बैठक संपल्यावर माझे निवेदन रस्त्यात चालत चालतच मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात दिले माझा उपक्रम त्यांना सांगितलं, त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेण्यास सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी, श्री. राजेंद्र मुठे यांची भेट घेतली आणि तसेच जिल्हा परिषदेत जाऊन निवेदन जमा केले.

३० तारखेला मी माझा हा उपक्रम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आणि उपक्रम पूर्ण करण्यात ज्यांनी मला मदत केली यांचे आभार मांडले.

एकूण ५१०० किलोमीटर प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, लोकांशी प्रत्यक्ष, भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र/आवृत्ती यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत व माझ्या उपक्रमाबद्दल प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा स्तरावरील शासकीय अधिकारी, मित्रपरिवार, सहकारी यांनी आमच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि उपक्रमास वेळोवेळी प्रोत्साहन मिळात गेले, त्यामुळेच मी हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला. काही उत्तम विधायक व समाजोपयोगी कार्य करताना व अगोदर कधी न भेटलेल्यांनी एकत्र येऊन, आमच्या या उपक्रमास मदत करणे, हा अनुभव माझ्याकरिता खुपच प्रेरणादायी होता. महिनाभर दुचाकीवरून केलेला प्रवास आणि  दरम्यानच्या भेटीगाठी हे अत्यंत आनंददायी अनुभव होते.

ज्या शासकीय अधिकाऱ्यांशी मी भेटलो, निवेदने सादर केली, त्यांनी देलेली सकारात्मक प्रतिक्रिया, माझ्या उपक्रामाचे कौतुक तसेच सहकार्य व मार्गदर्शन  केल्याबद्दल सर्व प्रशासकिय अधिकारी वर्गाचे आभार मानतो.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांनी प्रत्राद्वारे माझ्या उपक्रमास शुभेच्छा व जिल्हा स्तरावरील शासकिय यंत्रणानी आम्हास सहकार्य करण्याचे आवाहन  केले व वैयक्तिक स्तरावरही मदत करण्याचे आश्वासन दिले  त्यामुळे मी महाउर्जाचे श्री. हेमंत कुलकर्णी, श्री.हेमंत पाटील, श्री.विकास रोडे,  श्री.विनोद शिरसाट, श्री.फडके श्री. अभिजीत हिंगे व श्री. जायभाय यांचे सहित समस्त महाऊर्जाचे  शतशः आभारी आहे.

राज्य व जिल्हा पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक आणि  मासिक यामध्ये लेखन करणारे पत्रकार मित्र, तसेच स्थानिक दुरचित्रवाणीवरून बातम्या प्रसारण करणारे प्रतिनिधी, यांनी माझ्या उपक्रमास व सौर उर्जा वापराबाबत प्रसिद्धी दिल्याबद्दल, मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे आभार मानतो. त्यामुळेच मला प्रत्यक्षरीत्या अनेक लोकांपर्यंत सौर ऊर्जेचे महत्त्व पोहचवता आले.

जिल्हा स्तरावरील माझ्या खालील मित्रांनी त्यांच्या व्यस्त वेळातुन न कंटाळता केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.
नितिन सपकाळ(सातारा),  सचिन खांडेकर आणि सागर बाबर(सांगली),  प्रदिप  घोडके आणि सचिन पटिल(कोल्हापुर),  हार्दिक शिगले(सिंधुदुर्ग), नितिन पडाळकर आणि श्री. जगदीश चव्हाण(रत्नागिरी), निलेश पाटिल(रायगड), विशाल कुंभार (ठाणे आणि पालघर), दुर्गेश मारु, प्रशांत जोशी, मनोहर चव्हाण, विशाल शिंदे आणि योगेश पगर(नाशिक आणि नंदुरबार), महेंद्र नेरकर, प्रविण नवले आणि सागर जाधव(धुळे), अरुण कोष्टी, निलेश पाटील, शाम दिक्षित, रितेश माळी- सोयो सिस्टिम्स(जळगाव आणि बुलढाणा), श्रीकांत आणि संदिप(अकोला), किशोर काजळकर आणि श्री. मानकर(अमरावती), सचिन ढोणे, सुनिल गुंटे आणि अतुल भांदककर(वर्धा), प्रितेश उचकलवार(नागपुर), सुभाष सतदेव, श्री. तुरस्कर(भंडारा), पुरुषोत्तम बिसेन आणि विनोदकुमार चौधरी(गोंदिया), सुशांत रच्चावार, अनिल कुंटावार, दुर्गेश इंगोले आणि नंदकिशोर नल्लुरवार(गडचिरोली), श्री. दत्ता भाके, संजय कुंभार, हरिश बारे(चंद्रपुर), संदिप फुटाने आणि श्री. राउत(यवतमाळ), गजानन अंभोरे(वाशिम), विशाल(हिंगोली), माधव वाघमारे आणि श्री. दासरी(नांदेड), प्रशांत बेल्लाळे आणि व्यंकट राउतराव(लातुर), विकास मेटे आणि श्री. शिरपुकर(उस्मानाबाद), गिरिश इप्पाकायल(सोलापुर), श्री. मोमिन(बीड), राजेश पुरी(औरंगाबाद), सागर काळे, निलेश गोरे आणि श्री. विकास साळुंखे (अहमदनगर) आणि पुण्यातील अनेक सहकारी. 

जिल्हा स्तरावरील माझ्या मित्रांनी वेळापत्रकानुसार उपक्रमास सहकार्य करण्याकरिता नियोजन केले होते, परंतु नियोजित वेळेच्या अगोदर एक दिवस माझा प्रवास चालला होता त्यामुळे   अनेक माझ्या सहकाऱ्यांना भेटी देता आल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी मला माफ करावे.

माझ्या या उपक्रमास माझ्या संपुर्ण कुटुंबाकडुनही प्रोत्साहन मिळाले. माझे आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी विशाखा, माझ्या गोड मुली सुरभि आणि स्वानंदि यांनी काहीही कुरबुर न करिता दिलेल्या पाठिंब्यामुळे मी उपक्रम पुर्ण करु शकलो.

मी, श्री. विक्रम कोठारी, व्यवस्थापकीय संचालक, उर्जा फ्युचर सिस्टिम्स (इं) प्रा. लि. पुणे यांनी मला सदर उपक्रमास एक महिन्याची रजा मंजुर करुन उपक्रमास  अप्रत्यक्षपणे दिलेल्या प्रोत्सानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच प्रवासाचे नियोजन करण्यात मार्गदर्शन केल्याबद्दल, मी श्री. अजय गुप्ते यांचे आभार मानतो. उर्जा फ्युचर सिस्टिम्स (इं) प्रा. लि. पुणे यांच्या सर्व स्टाफनी केलेल्या सहकार्याबद्दल, मी उर्जा फ्युचर परिवारचे आभार मानतो.

सर्वात शेवट श्री. संतोष खोमणे यांनी आदल्या दिवशी हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज घेतला असताना या संपुर्ण प्रवासात माझी साथ दिली, त्यांच्यामुळे माझा हा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.
नियोजन वेळेत पूर्ण होईल का? हे शक्य नाही? अशा उपक्रमातून काहीही साध्य होणार नाही! अनावश्यक खटाटोप आहे! जिल्हांना खरंच भेटी देणार का? यापूर्वी आम्ही असे प्रयोग केले होते पण काहीही फायदा झाला नाही, असे अनेक शंका/प्रश्न  उपस्थित करणाऱ्यांनी मला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले. 
माझ्या या संकल्पनेस व सदर उपक्रम उत्तमरीत्या संपन्न करण्यासाठी, आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल व विविध माध्यमातुन दिलेल्या असंख्य  शुभेच्छांबद्दल,  मी पुनश्च आपला आभारी आहे. 

सौरभ कुंभार