Showing posts with label Rooftop Solar. Show all posts
Showing posts with label Rooftop Solar. Show all posts

Wednesday, December 30, 2015

सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार मोहीम सांगता

अपुरया विजेच्या संकटापासून वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत, पर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून, माझा खारीचा वाटा म्हणून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमाणात निर्मिती व्हावी, केवळ या उद्देशानेच, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा वापर शासकीय कार्यालयात व्हावा यासाठी मी, सौरभ लक्ष्मण कुंभार आणि माझा मित्र श्री संतोष खोमणे यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील ३४ जिल्हा मुख्यालयास दुचाकीवरून भेट देऊन शासकीय कार्यालयात व त्यांच्या संलग्न संस्थेत सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन दि. १ डिसेंबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ कालावधीत केले होते. या प्रवासात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय कार्यालयात सौर उर्जेचा (विशेषतः छतावरील सौर ऊर्जा - नेट मीटरींग) वापर करुन विजेच्या बाबतीत कार्यालये स्वयंपूर्ण करणेबाबत निवेदन सादर केले आहे.

एकूण ५१०० किलोमीटर प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, लोकांशी प्रत्यक्ष, भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र/आवृत्ती यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत व माझ्या उपक्रमाबद्दल प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा स्तरावरील शासकीय अधिकारी, मित्रपरिवार, सहकारी यांनी आमच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि उपक्रमास वेळोवेळी प्रोत्साहन मिळात गेले, त्यामुळेच मी हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला. काही उत्तम विधायक व समाजोपयोगी कार्य करताना व अगोदर कधी न भेटलेल्यांनी एकत्र येऊन, आमच्या या उपक्रमास मदत करणे, हा अनुभव माझ्याकरिता खुपच प्रेरणादायी होता. महिनाभर दुचाकीवरून केलेला प्रवास आणि  दरम्यानच्या भेटीगाठी हे अत्यंत आनंददायी अनुभव होते.

ज्या शासकीय अधिकाऱ्यांशी मी भेटलो, निवेदने सादर केली, त्यांनी देलेली सकारात्मक प्रतिक्रिया, माझ्या उपक्रामाचे कौतुक तसेच सहकार्य व मार्गदर्शन  केल्याबद्दल सर्व प्रशासकिय अधिकारी वर्गाचे आभार मानतो.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांनी प्रत्राद्वारे माझ्या उपक्रमास शुभेच्छा व जिल्हा स्तरावरील शासकिय यंत्रणानी आम्हास सहकार्य करण्याचे आवाहन  केले व वैयक्तिक स्तरावरही मदत करण्याचे आश्वासन दिले  त्यामुळे मी महाउर्जाचे श्री. हेमंत कुलकर्णी, श्री.हेमंत पाटील, श्री.विकास रोडेश्री.विनोद शिरसाट, श्री.फडके श्री. अभिजीत हिंगे व श्री. जायभाय यांचे सहित समस्त महाऊर्जाचे  शतशः आभारी आहे.

राज्य व जिल्हा पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक आणि  मासिक यामध्ये लेखन करणारे पत्रकार मित्र, तसेच स्थानिक दुरचित्रवाणीवरून बातम्या प्रसारण करणारे प्रतिनिधी, यांनी माझ्या उपक्रमास व सौर उर्जा वापराबाबत प्रसिद्धी दिल्याबद्दल, मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे आभार मानतो. त्यामुळेच मला प्रत्यक्षरीत्या अनेक लोकांपर्यंत सौर ऊर्जेचे महत्त्व पोहचवता आले.

जिल्हा स्तरावरील माझ्या खालील मित्रांनी त्यांच्या व्यस्त वेळातुन न कंटाळता केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.
नितिन सपकाळ(सातारा)सचिन खांडेकर आणि सागर बाबर(सांगली)प्रदिप  घोडके आणि सचिन पटिल(कोल्हापुर)हार्दिक शिगले(सिंधुदुर्ग), नितिन पडाळकर आणि श्री. जगदीश चव्हाण(रत्नागिरी), निलेश पाटिल(रायगड), विशाल कुंभार (ठाणे आणि पालघर), दुर्गेश मारु, प्रशांत जोशी, मनोहर चव्हाण आणि योगेश पगर(नाशिक आणि नंदुरबार), महेंद्र नेरकर, प्रविण नवले आणि सागर जाधव(धुळे), अरुण कोष्टी, निलेश पाटील, शाम दिक्षित, रितेश माळी- सोयो सिस्टिम्स(जळगाव आणि बुलढाणा), श्रीकांत आणि संदिप(अकोला), किशोर काजळकर आणि श्री. मानकर(अमरावती), सचिन ढोणे आणि सुनिल गुंटे(वर्धा), प्रितेश उचकलवार(नागपुर), सुभाष सतदेव, श्री. तुरस्कर(भंडारा), पुरुषोत्तम बिसेन आणि विनोदकुमार चौधरी(गोंदिया), सुशांत रच्चावार, अनिल कुंटावार, दुर्गेश इंगोले आणि नंदकिशोर नल्लुरवार(गडचिरोली), श्री. दत्ता भाके, संजय कुंभार, हरिश बारे(चंद्रपुर), संदिप फुटाने आणि श्री. राउत(यवतमाळ), गजानन अंभोरे(वाशिम), विशाल(हिंगोली), माधव वाघमारे आणि श्री. दासरी(नांदेड), प्रशांत बेल्लाळे(लातुर), विकास मेटे आणि श्री. शिरपुकर(उस्मानाबाद), गिरिश इप्पाकायल(सोलापुर), श्री. मोमिन(बीड), राजेश पुरी(औरंगाबाद), सागर काळे, निलेश गोरे आणि श्री. विकास साळुंखे (अहमदनगर) आणि पुण्यातील अनेक सहकारी.
जिल्हा स्तरावरील माझ्या मित्रांनी वेळापत्रकानुसार उपक्रमास सहकार्य करण्याकरिता नियोजन केले होते, परंतु नियोजित वेळेच्या अगोदर एक दिवस माझा प्रवास चालला होता त्यामुळे   अनेक माझ्या सहकाऱ्यांना भेटी देता आल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी मला माफ करावे.
माझ्या या उपक्रमास माझ्या संपुर्ण कुटुंबाकडुनही प्रोत्साहन मिळाले. माझे आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी विशाखा, माझ्या गोड मुली सुरभि आणि स्वानंदि यांनी काहीही कुरबुर न करिता दिलेल्या पाठिंब्यामुळे मी उपक्रम पुर्ण करु शकलो.
प्रवासाचे नियोजन करण्यात मार्गदर्शन केल्याबद्दल, मी श्री. अजय गुप्ते यांचे आभार मानतो. 

सर्वात शेवट श्री. संतोष खोमणे यांनी आदल्या दिवशी हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज घेतला असताना या संपुर्ण प्रवासात माझी साथ दिली, त्यांच्यामुळे माझा हा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.

नियोजन वेळेत पूर्ण होईल का? हे शक्य नाही? अशा उपक्रमातून काहीही साध्य होणार नाही! अनावश्यक खटाटोप आहे! जिल्हांना खरंच भेटी देणार का? यापूर्वी आम्ही असे प्रयोग केले होते पण काहीही फायदा झाला नाही, असे अनेक शंका/प्रश्न  उपस्थित करणाऱ्यांनी मला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले.

माझ्या या संकल्पनेस व सदर उपक्रम उत्तमरीत्या संपन्न करण्यासाठी, आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल व विविध माध्यमातुन दिलेल्या असंख्य  शुभेच्छांबद्दल,  मी पुनश्च आपला आभारी आहे.
Without your support and generosity I would not have been complete this task. Thanks (भावना व्यक्त करायला इंग्लिश जरा बरी पडते म्हणुन आपलं थोडंss...........!!)


असाच लोभ भविष्यातही असु द्या, धन्यवाद!

आपला स्नेहांकित 
सौरभ लक्ष्मण कुंभार



Saturday, October 31, 2015

सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जानिर्मिती यंत्रणा (नेट-मीटरिंग)

नुकतेच महाराष्ट्र सरकारने 10 सप्टेंबर 2015 रोजी एक छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा‘ याविषयी ऊर्जाविषयक धोरण (धोरण) प्रसिद्ध केले आहे. अत्यंत आकर्षक असे हे धोरण छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा‘ वरदान ठरेल. कुणीही ग्राहक जो स्थानिक ऊर्जा वितरण कंपनीचा ग्राहक आहे, तो यात भाग घेऊ शकतो. व्यक्ती, संस्था, छोटा उद्योग, औद्योगिक कारखाना वा एखादी गृहरचना संस्था, हे सर्व जण त्यांच्या असलेल्या मंजूर क्षमतेची सौर "फोटोव्होल्टाईक ऊर्जा यंत्रणा‘ त्यांच्या मालकीच्या छतावर जागेत लावून त्यामधून निर्माण झालेली वीज स्वतःच्या वापरासाठी आणि जास्तीची शिल्लक ऊर्जा संबंधित वीज वितरण कंपनीला देऊ शकतो. यासाठीची जी यंत्रणा बसविली जाते तिला नेट-मीटरिंग असे म्हणतात. या "नेट मीटरिंग‘ चे मुख्य कार्य हे सौरऊर्जेवरील यंत्रणेद्वारे घेतलेली वीज आणि वीज वितरण कंपनीकडून वापरण्यात आलेली वीज याचा तपशीलवार हिशेब ठेवण्यासाठी होते.

छतावरील सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जानिर्मिती यंत्रणा प्रामुख्याने तीन प्रकारांत येतात.
    1)"ऑफ ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा.
    2) "ऑन ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा.
    3) “ऑन ग्रीड विथ बॅटरी बॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसताना ही आणि वीज असतानाही चालणारी यंत्रणा.

ऑफ ग्रीड म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा. (प्रतिमा १)

(प्रतिमा १)
या यंत्रणेमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून गरजेनुसार वापरता येते. यामध्ये दिवसभरातील लागणाऱ्या ऊर्जेचा वापरही बॅटरीद्वारेच होतो आणि शिल्लक ऊर्जा हीसुद्धा बॅटरीमध्येच साठविली जाते. वीज नसतानासुद्धा बॅटरीमध्ये साठविलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या विजेच्या गरजा भागविता येतात हा या यंत्रणेचा मोठा फायदा असतो. यामधील बॅटरीज या सौरऊर्जा उपलब्ध नसताना नित्याच्या विजेच्या साह्यानेसुद्धा चार्ज करता येतात. यामध्ये वीज वितरण कंपनीला देता येणारी वीज ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. कारण बॅटरीमध्ये साठवून ठेवलेली ऊर्जा ही नेट मीटरिंग पद्धतीने देता येत नाही. ही यंत्रणा तुलनेने थोडी महाग असते.

"ऑन ग्रीड‘ यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा. (प्रतिमा २)

(प्रतिमा २)
सौरऊर्जेवर तयार होणारी वीज आणि नेहमीची वीज एकत्रितपणे सलग वापरता येते आणि तिचा संयुक्त वापर थांबल्यावर तयार होणारी; पण न वापरली जाणारी शिल्लक ऊर्जा वितरण कंपनीला देण्याची प्रक्रिया चालू होते. यामध्ये नेहमीची वीज नसेल, तर मात्र आपल्या स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी या ऊर्जेचे निर्माण होण्याची प्रक्रिया कामी येत नाही. एकंदर गरजांचे सुयोग्य मूल्यमापन करून योग्य क्षमतेची यंत्रणा आस्थापित करून घेतल्यास रात्री वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची आगाऊ निर्मिती दिवसा करून आणि ती वीज वितरण कंपनीला देऊन त्या दिलेल्या ऊर्जेच्या बदल्यात रात्री आपल्या गरजा भागविण्यासाठी वीजवापर करता येतो. कारण विजेच्या बदल्यात वीज हे समीकरणच आहे या नेट मीटरिंग यंत्रणेचे.

“ऑन ग्रीड विथ बॅटरी बॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही आणि वीज असतानाही चालणारी यंत्रणा. (प्रतिमा ३)

(प्रतिमा ३)
ही यंत्रणा म्हणजे वरील दोन्ही यंत्रणांचा समन्वय. यामध्ये सौरऊर्जेवर तयार होत असलेल्या ऊर्जेतून लागणारी ऊर्जा वापरता येते. वापरत असताना यंत्रणेबरोबर आलेल्या बॅटरीमध्ये साठवता येते आणि त्यानंतर शिल्लक राहणारी ऊर्जा वीज वितरण कंपनीला देता येते.

अशा या दोन प्रकारच्या यंत्रणा नेट मीटरिंग पद्धतीची सुयोग्य सांगड घालून वापरता येतात. वीज वितरण कंपनीच्या याबाबतच्या अटी आणि शर्ती या प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या आहेत आणि त्याबाबतचे स्पष्ट धोरण महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या राज्य शासनाच्या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये खासगी, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी अनुदानाची तरतूद नाही. या यंत्रणेसाठी गृह कर्जाशी संलग्न कमी दराचे कर्ज देण्याची तरतूद आहे. तसेच कर सवलतीच्या माध्यमातून होणारी बचत आणि वीज कंपनीने वीज विकत घेण्यासाठी केलेला करार हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल ठरेल.

अधिक माहिती हवी असल्यास (सौर उर्जा माहिती) टिचकी मारा.