Sunday, June 12, 2016

सौर ऊर्जा : गरम पाणी व विजेला पर्याय

सौर ऊर्जा : गरम पाणी व विजेला पर्याय
५ तारखेला पर्यावरण दिन आहे. महाराष्ट्र शासन ३ जून ते ९ जून पर्यंत पर्यावरण सप्ताह साजरा करीत आहे त्यानिमित्ताने..............
आजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणासाठी आपल्याला विजेची गरज भासते. वाढत्या नागरिकीकरणामुळे व त्याचबरोबर सतत वाढणारी लोकसंख्या यामुळे विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. पण सध्या अस्तित्वातील वीजनिर्मितीची क्षमता अपुरी पडत आहे. यासाठी सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून घेणे हाच यावर एकमेव उपाय आहे. म्हणूनच अपारंपरिक ऊर्जेचा होणारा वापर हा भावी काळासाठी गरजेचा व बचतीचा महामंत्र होऊ बसला आहे.
खालील प्रकारच्या उर्जा आपल्याला सूर्यापासून मिळवता येतात:
१) उष्ण उर्जा (Solar Thermal)
२) प्रकाशीय उर्जा (फोटोव्होल्टाइक/Photovoltaic)
दैनंदिन घरगुती वापराकरिता सौर ऊर्जेचा वापर शक्यतो तीन कारणांसाठी करता येतो. त्यापैकी एक म्हणजे गरम पाण्यासाठी ‘सोलर हिटर’ अन्न शिजविण्यासाठी “सोलर कुकर” व घरात लागण्यार्या विजेच्या उपकरणांच्या “वीजनिर्मितीसाठी” करता येऊ शकतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन वापराकरिता सौर उर्जेचा उपयोग गरम पाणी, अन्न शिजविण्याकरिता व वीज वापर  करण्याकरिता करू शकतात आणि नैसर्गिक ऊर्जेचा लाभ घेऊन बचतीचा नवा मार्ग अवलंबू शकतात.
सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे व त्याचा उपयोग
१) सौर उष्ण जल प्रणाली (Solar Water Heating System).
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब म्हणजेच सोलर वॉटर हीटर. सूर्यापासून येणाऱ्या उष्ण ऊर्जेचा वापर पाणी गरम करण्यासाठी उपयोग केला जातो. या प्रकारात सूर्यापासून येणारी उष्णता हिटिंग पॅनेल/नाळ्यामध्ये घेऊन सहजरीत्या थंड पाणी ८० अंश से. पर्यंत उष्ण करता येऊ शकते. यामध्ये कोणताही इंधनखर्च, वीजखर्च लागत नसून अतिशय कमी देखभाल खर्च लागतो. या सिस्टीमचे आयुष्य साधारणपणे ८ ते १० वर्षे असते. फक्त सुरुवातीला एकदाच गुंतवणुकीची गरज असते.
सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. (Flat Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पैकी एफ.पी.सी. हा प्रकार पूर्वीपासून वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. नवीन तंत्रज्ञान असल्याने त्याची कार्यक्षमता खूप चांगली आहे. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!
सोलर काचेच्या नळ्यावर किंवा पॅनल्सवर पक्षी विष्ठा टाकतात किंवा धूळीचा थर बसून पुरेसे ऊन पॅनल्स/नळ्यांवर पंडत नाही, त्यावेळी पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ करावी लागते.
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.
उदा : एका घरात ५ माणसे याप्रमाणे एकासाठी २५ लिटर्स पाणी याप्रमाणे १२५ लिटर्स पाणी आंघोळीसाठी लागते. १२५ लिटर्स पाणी प्रतिदिनप्रमाणे प्रणाली घेणे आवश्यक असते. पण त्याच ५ पैकी ४ जणांनी दिवसात संध्याकाळी जर का पुन्हा आंघोळ केली तर त्यांनी वापरलेल्या गरम पाण्याच्या बदल्यात थंड पाणी गरम पाण्याच्या टाकीत जमा होत असते व भल्या पहाटे सूर्य नसल्याने ते पाणी गारच राहते व जेव्हा ते ५ जण सकाळी आंघोळीसाठी गेल्यास त्यांना थंडच पाणी मिळणार व असे लोक गरम पाणी मिळत नसल्याची ओरड करतात किंवा घरामध्ये अतिरिक्त माणसे आल्यास केवळ ५ व्यक्तींकरिता डिझाईन केलेली सयंत्र पुरेसे पडत नाही किंवा तसं पाहिलं तर एक वेळच्या आंघोळीचे पाणी उपलब्ध असताना त्याचा दोन वेळेस वापर केल्याने प्रणाली अयशस्वी होत असते याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने सौर ऊर्जा काही कामाची नाही असा सर्वाचा गैरसमज होऊ शकतो, पण हे चुकीचे असून जास्त गरम पाणी व जितक्या वेळी पाहिजे असल्यास त्याप्रमाणे प्रणालीचे डिझाईन करून घेतल्यास योग्य लाभ दरवेळेस सहज घेता येतो. असे गैरसमज पसरवू नये याकरिता जास्त क्षमतेची सोलर सिस्टीम घेणे भाग असते. जर वरील प्रमाणे १२५ लिटर्स पाणी प्रतिदिन आवश्यक्यता असेल तर आम्ही २५० लिटर्स पाणी प्रतिदिन खरेदी करावयाचा सल्ला देतो. कारण जेव्हा आपण एक बादली पाणी काढल्यानंतर तेवढेच पाणी गरम पाणी वितरण केलेल्या पाईपा मध्ये साठून राहते आणि कालांतराने पाईप मधील पाणी थंड होण्याचा संभव असतो. तसेच प्रणाली गच्चीवर ठेवण्यासाठी जागेची गरज लागते. याशिवाय गरम पाणी घराध्ये देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन करावी लागते. पण यामध्ये सयंत्राची किंमत व संपूर्ण आस्थापना करावयाची असल्याने सुरुवातीलाच गुंतवणूक लागते. याव्यतिरिक्त पुढे कोणत्याही वर्षी इंधन खर्च, पुनर्गुतवणूक, विजेची बिले, महागाई, इ.चा त्रास कमी व नाहीसा होऊन त्यावर सहज मात करता येऊ शकते. पावसाळ्याचे काही दिवस वगळले तर उन्हाळ्यात सिस्टीम सतत कार्यरत रहाते तसेच हिवाळ्यातील काही दिवसांचा अपवाद सोडल्यास सौर ऊर्जेचा यथायोग्य वापर करणे सहज शक्य आहे. परंतु आज तंत्रज्ञान विकसित झालेले आहे त्यामुळे काही सयंत्रामध्ये हवेतील/ वातावरणातील उष्णता शोषून पाणी गरम केले जाते.
सौर वॉटर हिटर सिस्टीम खूप खर्चिक आहे हि दुसरी ओरड या बाबतीत ऐकावयास मिळते. यासाठी एक छोटे उदाहरण देऊ इच्छितो की, आपण ५०-६० हजारांची दुचाकी खरेदी करतो त्यानंतर त्या मध्ये ५० रु. प्रतिलिटर पेट्रोल भरून गाडीचा उपयोग केला जातो व वेळच्या वेळी मेंटेनन्ससुद्धा करावा लागतो. त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण सौर ऊर्जेसाठी फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते व पुढे फक्त मोफत ऊर्जा.. मोफत वीज व फक्त मोफत गरम पाणी.............
आजमितीला सुमारे ४० ते ५०% कुटुंबे पाणी गरम करण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर करतात. घरातील ऊर्जेच्या वापराचा विचार करता अन्न शिजवणे, पाणी गरम करणे यावर जास्तीत जास्त ऊर्जा खर्च केली जाते. काही कुटुंबे इलेक्टि्रक गीझरचा वापर करतात. त्यामुळे फक्त पाणी गरम करण्यासाठी दर वर्षी पाच माणसांच्या कुटुंबाला सुमारे १५०० युनिट विजेचा वापर करावा लागतो. या विजेची किंमत सात ते साडेसात हजार रुपये इतकी मोजावी लागते आणि दिवसेंदिवस इलेक्ट्रिसिटीचा दर वाढत चालला आहे हे हि लक्षात घ्यावे लागेल. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून बघितल्यास एका कुटुंबाकडून वर्षाकाठी प्रचंड हानी झालेली असते. हा सर्व हिशोब बघता विजेवर चालणाऱ्या गीझरपेक्षा सोलर वॉटर हीटर किती फायदेशीर आहे हे कळते, ज्यामुळे २.५ ते ३ वर्षात किंमत वसूल तर होतेच, शिवाय किमान १० वर्षे कोणताही खर्च न करता पाणी गरम मिळते आणि प्रदूषणापासून दूर ठेवते. सौर वॉटर हिटर सिस्टीमवर केलेला खर्च सदनिकेच्या खरेदीच्या तुलनेत नगण्य असतो. त्यामुळे आपल्या इमारतीवर असे संयंत्र बसवून घेणे खूप फायद्याचे असते.
संपूर्ण सुरक्षित व अल्प देखभाल, दीर्घारुषी आणि प्रदूषणविरहित असे हे संयंत्र आहे. सौर उष्णजलसंयंत्रच्रा विविध महानगरपालिका व नगरपालिकानी नवीन गृहप्रकल्पांसाठी सौर उष्णजलसंरंत्र आस्थापित करण्राचे अनिवार्य (बंधनकारक) केले असून महापालिकांनी मिळकत करामध्ये सवलत देत आहे.
जसा, आज खोट्या प्रतिष्ठेच्या लोभापायी लोकं ५०-५० हजाराचे मोबाईल घेतात, का तर उंचा मोबाईल वापरणे हे प्रेस्टिज सिंबल (Prestige Symbol) बनलेला आहे (भले, मोबाईल मधील काही समजेना का?). आज मी आवाहन करतो कि जसा उंचा मोबाईल वापरणे हे प्रेस्टिज सिंबल आहे, तसा माझ्या घरावर सौर उर्जेची यंत्रणा बसवलेली आहे. हा हि एक प्रेस्टिज सिंबल बनवा, आपण रोजचे जर ४ युनिट वाचविले तर पर्यायाने आपल्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासात हातभार लागू शकतो, पण गरज आहे, हा विस्तृत विचार करण्याची...................    
२) सौर प्रकाशीय उर्जा वीजप्रणाली (Solar Photovoltaic Power System).
सौर ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त होत आहे, असा जर विचार केला तर असे समजते की भारत देश विषुववृत्ताच्या जवळ आहे. सूर्य विषुववृत्तापासून उत्तरायणात उत्तरेकडे आणि दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. या काळातही सूर्याकडून येणारे किरण भारतावर पडताना लंबरूप असतात. या किरणांची कार्यक्षमता सर्वाधिक असल्याने भारत हा देश सौर ऊर्जेचा देश म्हणून ओळखला जातो. सुमारे ३२५ दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सर्व देशवासीयांनी समाजाभिमुख होऊन लक्ष द्यायला हवे. दर दिवशी सूर्याकडून १ चौ.मी. क्षेत्रफळावर १ किलोवॉट प्रतितास एवढी विद्युतऊर्जा मिळत असते. उदाहरणच द्यायचे म्हटले, तर या ऊर्जेत १०० वॉटचा एक दिवा १० तास चालू शकतो, इतकी क्षमता त्यात असते. वीजनिर्मितीकरिता, पाणी गरम करण्याकरिता, अन्न शिजवण्याकरिता, वेगवेगळे पदार्थ वाळवण्याकरिता, औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया कामांकरिता आपण या क्षेत्रफळावर पडणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. आजमितीला सौर ऊर्जेविषयी भारतात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. परंतु हा वेग अतिशय मंद आहे. ज्या पध्दतीने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसू लागले आहेत, त्या तुलनेत समाजात त्या विषयीची जागरूकता, त्या विषयीच्या उपाययोजना करण्याबाबत समाजात अनास्था दिसून येत आहे.
एकटया महाराष्ट्राचा विचार करता आपल्याला सुमारे उत्पादित वीज आणि विजेची मागणी यामध्ये पचंड तफावत आहे. परिणामी अनेक खेडेगावांमध्ये भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक कारखाने, शेती व्यवसाय, लघुउद्योग अडचणीत आले आहेत. सौर वीजनिर्मिती हा यावर उत्तम पर्याय असून वैयक्तिक पातळीवर सौर वीजयंत्रणा बसवता येणे शक्य आहे. या यंत्रणेकरिता एकदाच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक करताना आपण किती दिवे, पंखे - किती वॉटचे आणि किती काळ चालवणार आहोत, त्यावर वीजनिर्मिती किती झाली पाहिजे ते ठरवले जाते. आजमितीला किमान प्रकाश देणारा छोटा दिवा रु. १२०० पासून बाजारात उपलब्ध आहे. तसेच ३ दिवे आणि १ टेबल फॅन ३-४ तास चालेल अशा प्रकारचे संच फक्त रु. १५,०००/- मध्ये उपलब्ध आहेत.
केरोसीनचा दिवा वापरणाऱ्या कुटुंबाला असा छोटा संच घेता येणे निश्चित शक्य असून दर दिवशीचे किमान ५ रुपयांचे, तर वर्षाचे किमान १५०० रुपयांचे केरोसीन यामुळे वाचू शकेल. पुढील काळात फक्त ३०० रुपये वर्षाकाठी खर्च केले, तर हा छोटा दिवा किमान १५ वर्षे चालू राहू शकेल. तसेच दुसऱ्या संचाचा विचार केल्यास दर दिवशी १५ रुपयांची बचत झाल्याने दर वर्षी किमान ४५०० रुपयांची बचत होणार असून तीन वर्षात या संचाची किंमत वसूल होऊ शकते. याच प्रकारची सौर वीज यंत्रणा सोसायटीतील जिन्यांमध्येही बसवता येते. किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही असल्याने महाराष्ट्रातील हजारो सदनिकांच्या गच्चीवर ही यंत्रणा बसवणे बंधनकारक केल्यास महाराष्ट्रातील विजेचा तुटवडा मोठया प्रमाणावर कमी होऊन उद्योगधंद्यांना हा पुरवठा करून उत्पन्नवाढीस चालना देणे शक्य होईल.
आपल्या देशात अजूनही सुमारे ६५% जनता ग्रामीण भागात राहत असून १८ कोटी कुटुंबे अन्न शिजवण्यासाठी जंगलातील लाकूडफाटा वापरतात. हे इंधन गोळा करण्यासाठी दर आठवडयाला १६ ते १६ तास खर्च करतात. शिवाय या लाकडाचे ज्वलन होताना धूर निर्माण होतो. या धुरामुळे दर वर्षी सुमारे ५ लाख गृहिणींना आपला जीव गमवावा लागतो, ही बाब सर्व जनतेसमोर कधी येतच नाही. शिवाय वातावरणात लाखो टन कार्बन डायऑॅक्साईड सोडला जातो त्याचा हिशोबही आपल्याला कळत नाही, पण त्यांचे दुष्परिणाम मात्र सर्वांना सोसावे लागतात हे निश्चित. या विषयीची जाणीव या समाजात होणे गरजेचे आहे. कारण खेडेगावातील समाज हा परंपरागत प्रथांमध्ये रूढ झालेला आहे. त्याला बदलणे मात्र काळाची गरज आहे. हे फक्त स्वयंपाकाच्या इंधनाबद्दल झाले. असाच विचार करता अजून ज्या ठिकाणी वीज पोहोचूच शकली नाही, असाही ग्रामीण परिसर आपल्या देशात आहे. सुमारे ८ कोटी कुटुंबे केरोसीन दिव्याचा वापर करतात. यामुळे प्रत्येक कुटुंब दरमहा ४ लीटर, तर वर्षाला ५० लीटर केरोसीनचा वापर करते. म्हणजे सुमारे १५०० रुपयांचे इंधन वापरले जाते. याचाच अर्थ दर वर्षी सुमारे ४० कोटी लीटर केरोसीन फक्त प्रकाश मिळवण्यासाठी खर्च होते. यातून ९.६ कोटी टन एवढा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळून पर्यावरणाला हानी पोहोचवली जात आहे. हे वास्तव आणि शहरातील वास्तव सारखेच आहे. शहरात आर्थिक समृध्दीच्या जोरावर वाहनांचा - पर्यायाने इंधनांचा वापर, वातानुकूलित दालनांचा नको तेवढा वापर आणि दिव्यांचा झगमगाट ही पर्यावरणाला हानी पोहोचवणारी यंत्रणा अस्तित्वात आहे. वरील ग्रामीण आणि शहरी उदाहरणे आपलीच असून आपणच आपल्याला कसे विनाशाकडे नेत आहोत, याची उदाहरणे आहेत.
याचा उपयोग घरातील प्रकाश पुरवठय़ासाठी केला जातो. दररोज ३ ते ५ तास सौर प्रकाश पुरवठा वेगवेगळ्या प्रणालीनुसार मिळविता येतो. शुद्ध सिलिकॉनच्या पातळ चकत्या वापरून सौर पॅनेल बनवतात. या पॅनेलमध्ये सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते. दुर्गम प्रदेशात पाणी उपसणाऱ्या पंपाना, शीत कपाटे व रात्रीच्या वेळेस उजेडाकरिता सौर- पॅनेलच्या मार्फत वीजपुरवठा होतो.
सौर पथदीप (Solar Street Lamps): डोंगराळ व दुर्गम भागातील रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी याचा पथदीप म्हणून वापर केला जातो, सूर्यास्त ते सूर्योदय यावर आपोआप चालू व बंद होणारी यंत्रणा यात असल्याने खूप उपयोगाची ठरते.
सौर कंदील (सोलर लॅटर्न्‍स)  (Solar Lanterns): लहान, सुटसुटीत अशी सौर प्रकाश प्रणाली जी आपण कोठेही घेऊन जाऊ शकतो. अंधाऱ्या वाटेवर, शेत, डोंगर भागात वापरण्यास जास्त उपयुक्त ठरते. २ ते ४ तासांपर्यंत सीएफएल (CFL) किंवा एलईडीचा (LED) पांढरा व स्वच्छ प्रकाश मिळतो. 
सौर घरगुती दीप (Solar Home Lamps): डोंगराळ, दुर्गम व ज्या भागात वीज पोहोचलेली नाही अशा भागात राहणाऱ्या कुटुंबाना रात्रीच्या वेळी उजेडाकरिता या प्रकारच्या छोट्या सयंत्राचा वापर केला जातो. यामध्ये १ दिव्यापासून ४ दिव्यांपर्यंत गरजेनुसार निवड केली जाते.
नुकतेचमहाराष्ट्र सरकारने 10 सप्टेंबर 2015 रोजी एक छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा‘ याविषयी ऊर्जाविषयक धोरण प्रसिद्ध केले आहे. अत्यंत आकर्षक असे हे धोरण छतावरील "सौर फोटोव्होल्टाईक (Rooftop Solar) ऊर्जानिर्मिती यंत्रणा” वरदान ठरेल. कुणीही ग्राहक जो स्थानिक ऊर्जा वितरण कंपनीचा ग्राहक आहे, तो यात भाग घेऊ शकतो. व्यक्ती, संस्था, छोटा उद्योग, औद्योगिक कारखाना वा एखादी गृहरचना संस्था, हे सर्व जण त्यांच्या असलेल्या मंजूर क्षमतेची सौर "फोटोव्होल्टाईक ऊर्जा यंत्रणा‘ त्यांच्या मालकीच्या छतावर जागेत लावून त्यामधून निर्माण झालेली वीज स्वतःच्या वापरासाठी आणि जास्तीची शिल्लक ऊर्जा संबंधित वितरण कंपनीला देऊ शकतो. यासाठीची जी यंत्रणा बसविली जाते तिला नेट-मीटरिंग असे म्हणतात. या "नेट मीटरिंग‘चे मुख्य कार्य हे सौरऊर्जेवरील यंत्रणेद्वारे घेतलेली वीज आणि वितरण कंपनीकडून वापरण्यात आलेली वीज याचा तपशीलवार हिशेब ठेवण्यासाठी होते.
छतावरील सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जा निर्मिती यंत्रणा प्रामुख्याने ३ प्रकारांत येतात.
1)    "ऑफ ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा.
2)     "ऑन ग्रीड” यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा.
3)     “ऑन ग्रीड विथ बॅटरीबॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसताना ही आणि वीज असतानाही चालणारी यंत्रणा.
ऑफ ग्रीड म्हणजे वीज नसतानाही चालविता येणारी यंत्रणा.
या यंत्रणेमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून गरजेनुसार वापरता येते. यामध्ये दिवसभरातील लागणाऱ्या ऊर्जेचा वापरही बॅटरीद्वारेच होतो आणि शिल्लक ऊर्जा ही सुद्धा बॅटरीमध्येच साठविली जाते. वीज नसतानासुद्धा बॅटरीमध्ये साठविलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या विजेच्या गरजा भागविता येतात हा या यंत्रणेचा मोठा फायदा असतो. यामधील बॅटरीज या सौरऊर्जा उपलब्ध नसताना नित्याच्या विजेच्या साह्याने सुद्धा चार्ज करता येतात. यामध्ये वीज वितरण कंपनीला देता येणारी वीज ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. कारण बॅटरीमध्ये साठवून ठेवलेली ऊर्जा ही नेट मीटरिंग पद्धतीने देता येत नाही. ही यंत्रणा तुलनेने थोडी महाग असते.
"ऑन ग्रीड’’ यंत्रणा म्हणजे वीज आणि सौरऊर्जा यांच्या समन्वयाने चालणारी यंत्रणा.
सौरऊर्जेवर तयार होणारी वीज आणि नेहमीची वीज एकत्रितपणे सलग वापरता येते आणि तिचा संयुक्त वापर थांबल्यावर तयार होणारी; पण न वापरली जाणारी शिल्लक ऊर्जा वितरण कंपनीला देण्याची प्रक्रिया चालू होते. यामध्ये नेहमीची वीज नसेल, तर मात्र आपल्या स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी या ऊर्जेचे निर्माण होण्याची प्रक्रिया कामी येत नाही. एकंदर गरजांचे सुयोग्य मूल्यमापन करून योग्य क्षमतेची यंत्रणा आस्थापित करून घेतल्यास रात्री वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची आगाऊ निर्मिती दिवसा करून आणि ती वीज वितरण कंपनीला देऊन त्या दिलेल्या ऊर्जेच्या बदल्यात रात्री आपल्या गरजा भागविण्यासाठीवीजवापर करता येतो. कारण विजेच्या बदल्यात वीज हे समीकरणच आहे या नेट मीटरिंग यंत्रणेचे.
“ऑन ग्रीडविथबॅटरीबॅकअप” यंत्रणा म्हणजे वीज नसतानाही आणिवीज असतानाही चालणारी यंत्रणा.
ही यंत्रणा म्हणजे वरील दोन्ही यंत्रणांचा समन्वय. यामध्ये सौरऊर्जेवर तयार होत असलेल्या ऊर्जेतून लागणारी ऊर्जा वापरता येते. वापरत असताना यंत्रणेबरोबर आलेल्या बॅटरीमध्ये साठवता येते आणि त्यानंतर शिल्लक राहणारी ऊर्जा वीज वितरण कंपनीला देता येते.
अशा या दोन प्रकारच्या यंत्रणा नेट मीटरिंग पद्धतीची सुयोग्य सांगड घालून वापरता येतात. वीज वितरण कंपनीच्या याबाबतच्या अटी आणि शर्ती या प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या आहेत आणि त्याबाबतचे स्पष्ट धोरण महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या राज्य शासनाच्या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये सौर उर्जेमार्फत निर्मित वीज यंत्रणेसाठी खासगी वापराकरिता केंद्र सरकारकडून अनुदानाची तरतूद केलेली आहे. राज्य शासनाच्या वतीनेही काही अनुदान पदरात पडेल अशी संकेतही व चर्चा सुरु आहेत असे समजत आहे. पण उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी अनुदानाची तरतूद नाही. या यंत्रणेसाठी गृह कर्जाशी संलग्न कमी दराचे कर्ज देण्याची तरतूद आहे.
सौर ऊर्जा वापरण्यास अत्यंत सोपी, कोणतेही प्रदूषण न करणारी, भरवशाची, मुबलक प्रमाणात वापरता येणारी, मोफत मिळणारी, घरांघरांवर विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा देणारी सौर ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शाश्वत असा नैसर्गिक अपारंपरिक स्रोत  आहे. सौर ऊर्जेबरोबर, पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून त्यांच्या वापरामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला कळत-नकळत फायदा होणार आहे.
अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर मोठया प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. रस्त्यारस्त्यावर सौर दिव्यांची यंत्रणा बसवून खेडेगावांपर्यत प्रकाश पोहोचवण्याचे प्रयत्न देशपातळीवर सुरू आहेत. विजेचा पुरवठा अखंड सुरू राहण्याकरिता आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता सौर ऊर्जेचे, पवनऊर्जेचे प्रकल्प महाराष्ट्रात आणि इतर राज्यात उभारले जात आहेत.
वापरण्यास अत्यंत सोपी, कोणतेही प्रदूषण न करणारी, भरवशाची, मुबलक प्रमाणात वापरता येणारी, मोफत मिळणारी, घरांघरांवर विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा देणारी सौर ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शाश्वत असा नैसर्गिक अपारंपरिक स्रोत  आहे.
सौर ऊर्जेबरोबर पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून त्यांच्या वापरामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला कळत-नकळत फायदा होणार आहे. आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला हा फायदा व्हावा असे जर वाटत असेल, तर स्वत:पासून त्याची सुरुवात झाली पाहिजे.

https://amzn.to/2Ryg8wg


३) सौरचूल किंवा सौरकूकर
सोलर कुकर, सौर वीज यंत्रणा, सौरबंब, सोलर ड्रायर इ. चा वापर करणे म्हणजेच भावी पिढीची सोय करण्यासारखे आहे. सोलर कुकरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ शिजतात. महाराष्ट्रात सर्वत्र सोलर कुकरमध्ये अन्न शिजते. महाराष्ट्रातील किमान ५०% कुटुंबे आपापल्या घरी सोलर कुकरचा वापर करू शकतात. याकरिता फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येक जण संतुलित आणि पोषक आहाराच्या मागे लागलेला आहे. सूर्यचुलीत तयार झालेल्या अन्नामध्ये जीवनसत्त्व जसेच्या तसे राहत असल्याने अन्नाची चव अतिशय उत्तम लागते. यातून अनेक व्याधी दूर होत असल्याने अनेक वैद्य सौर ऊर्जेवर शिजलेले अन्न खायचे सुचवतात. सुमारे ३०० दिवस कार्यान्वित राहू शकणारा सोलर कुकर एका वर्षातच त्याची किंमत वसूल करून देतो. आपण सकाळी आणि संध्याकाळी काय जेवणार आहोत याचे नियोजन केल्यास दोन वेळचे अन्न आपण त्यावर शिजवू शकतो. उन्हाळयात ९०-१००से, तर हिवाळयात ८५-१०० से.पर्यंत तापमान सूर्यचुलीवर निर्माण होते. त्या तापमानाला दीड ते दोन तासात अन्न शिजून तयार होते. तापमान कमी असल्याने अन्न हळुवार शिजते. त्यामुळे अन्न करपण्याची अथवा जळण्याची शक्यता सूर्यचुलीत नसते. माउंट अबू, तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा देवस्थान या ठिकाणी सुमारे ४०-५० हजार भाविकांचा स्वयंपाक सौर ऊर्जेवर होतो. तसेच बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणी सोसायटयांमध्ये कम्युनिटी सोलर कुकरचा वापर केला जातो, जेणेकरून संध्याकाळी कामावरून आल्यानंतर या कुकरमध्ये तयार झालेल्या अन्नाचे डबे घरी घेऊन जाता येतात. असेच सोलर कुकर महाराष्ट्रातही सरकारी व खाजगी कार्यालयांत किंवा रहिवासी सोसायटयांमध्ये लावले गेल्यास अब्जावधी रुपयांचे इंधन वाचू शकेल, शिवाय मोठया प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडची निर्मिती थांबून पर्यावरणाची हानी टळू शकेल.
ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या, बटाटे उत्तम शिजते. बाकी मेंटेनन्स शून्य, फक्त रोजच्या रोज एकदा काच स्वच्छ करावी लागते. सोलर वॉटर हिटर प्रमाणेच या कुकरलाही मुबलक स्वच्छ सूर्य प्रकाश असणे गरजेचे आहे. म्हणजेच पावसाळ्यात जेंव्हा आकाश ढगाळ असते व जेंव्हा सूर्यप्रकाश पुरेसा नसतो त्यावेळी हा कुकर अन्न शिजवण्यासाठी वापरता येत नाही.
पावसाळयात सूर्यचूल चालत नाही, वीजनिर्मिती होत नाही, अन्न तयार होण्यास खूप वेळ लागतो, चपाती-भाकरी होत नाही, रात्री वापरता येत नाही, उपकरण महाग आहेत, देखभाल कशी करणार?.. मग सौर ऊर्जेवरील उपकरणे वापरायचीच नाही का? याचा विचार सर्वांगाने होणे आवश्यक आहे. भारतात पावसाळा चार महिने समजला जातो, तो खरोखरच १२० दिवस पडतो का? पाऊस जेमतेम ३५-४० दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे ६५ दिवस सोडून दिले, तरी ३०० दिवस उत्तम प्रकारे या सर्व उपकरणांचा वापर करता येतो. चपाती-भाकरी भाजता येत नाही, हे बरोबर आहे. पण आपल्या आहाराचा विचार करता आपल्या ताटात डाळ, भात, भाजी आणि चपाती किंवा भाकरी असे पदार्थ असतात. यातील तीन पदार्थ शिजणारे आहेत, तर एक भाजण्याचा - म्हणजे जर ७५% अन्न तयार होत असेल, तर २५%चा विचार का करायचा? जे मिळत आहे, ते प्रथम स्वीकारायला तर शिका.. कारण चपाती-भाकरी भाजणे यालाही पर्याय आहेत. त्यासाठी जागा आणि पैसे खर्च करण्याची तयारी ठेवल्यास तेही शक्य होऊ शकते. राहिले ते वेळेचे गणित. १९९२ साली अन्न शिजवण्याचे काही प्रयोग करण्यात आले. त्या वेळी तुरीची डाळ, बटाटे शिजण्याकरिता अडीच ते तीन तास लागत असायचे. सद्य परिस्थितीत मात्र हे शिजायला जेमतेम दीड तास पुरेसा होतो. यामागील कारण म्हणजे संपूर्ण विश्वाचे एक ते दीड अंश सेल्सिअसने वाढलेले तापमान होय.
वीज असूनही अंधार
आज देशात ज्या घरांपर्यत वीज पोहोचली आहे, अशा घरांतही अंधार बघावयास मिळतो, ही अत्यंत खेदकारक गोष्ट आहे. आपला देश समृध्दीकडे जात असताना घरगुती वापरासाठीच्या विजेची पूर्तता आपण करू शकत नाही, म्हणजे कुठेतरी गणित चुकत आहे, असे समजले पाहिजे. त्याविषयी आपण प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुख्यतः त्यासाठी मोठया प्रमाणावर - म्हणजेच सुमारे ५०% औष्णिक वीज कोळशाचा वापर करून तयार होते आणि ५०% इतर स्रोतांपासून वीज निर्माण केली जाते. यातील सर्वात खर्चीक, प्रदूषण निर्माण करणारी वीज म्हणजे औष्णिक वीज. १ युनिट वीजनिर्मितीसाठी ८०० ग्रॅम कोळशाचा आणि १० लीटर पाण्याचा वापर केला जातो. शिवाय ज्या ठिकाणी वीजनिर्मिती होते, तेथून ग्राहकापर्यंत पोहोचताना प्रवाहाच्या रोधामुळे 33% वीज खर्च होते, हा यामधील मोठा तोटा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन २०४०-५० च्या दरम्यान कोळशाचे साठे संपुष्टात येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. वरील सर्व आकडेवारी पाहता औष्णिक वीज परवडणारी नसून फक्त सरकारी अनुदानामुळे आपल्याला स्वस्त मिळत आहे, हे विसरून चालणार नाही.
समाजातील समज-गैरसमज आणि अपेक्षा
आता प्रश्न राहिला तो उपकरण महाग असल्याचा. जितक्या मोठया प्रमाणात या सर्व उपकरणांचा वापर वाढेल, तशा याच्या किंमतीही कमी होतील. सुरुवातीचा मोबाईल अतिसामान्य माणसाला परवडणारा नव्हताच; पण जसा त्याचा वापर वाढला, कॉल कॉस्ट कमी झाली, तशा मोबाइलच्या किमतीही कमी झाल्या. आज सोलर सेलच्या बाबतीतही तसेच झाले आहे. दहा वर्षांपूर्वी ४०० रु. प्रतिवॉट असा असलेला खर्च आज १०० ते १८० रु. प्रतिवॉटच्या दरम्यान खाली आलेला आहे. आता राहिला तो अनुदानाचा प्रश्न. गेल्या वर्षापर्यंत सोलर वॉटर हीटर यंत्रणेवर अनुदान मिळत होते, पण आता ते बंद झालेले आहे. सौर वीज यंत्रणेबाबत अतिदुर्गम भागाकरिता अनुदान दिले जाते. अनुदान म्हणून नाही, पण कमी व्याजदराने राष्ट्रीयीकृत बँका यासाठी कर्ज देतात. त्यासाठी बँकांच्या गरजेनुरूप कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. याउलट विचार करता असे लक्षात येते की जितका वापर लवकर सुरू होईल, तितकाच लवकर खर्च वसूल होऊन मोफत सेवा मिळू लागेल, हेच आपले अनुदान समजू या आणि अपारंपरिक, कधीही न संपणारी, मोफत मिळणारी सौर ऊर्जा वापरायचा निश्चय करू या.
सौर ऊर्जा अभ्यासक आणि मार्गदर्शक
श्री. सौरभ लक्ष्मण कुंभार.
व्यवस्थापक -विपणन, सुरभि सिस्टम्स
ऑफिस क्र. १, १८/२०, उष:काल हाउसिंग सोसायटी, तरवडेवस्ती. महंमदवाडी, पुणे – ४११०६०
महंमदवाडी पोलीस चौकी समोर फोन. ०२० २६९७०९६४  मोबा: ९८६०००००४५
अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या इ-मेलवर आपल्या शंका व कुणाला सौर यंत्रणा बसविण्यास  इस्छुक असाल तर आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता. 
sales@surbhisystems.in आणि saurabhkumbhar@gmail.com   
blog:www.saurabhkumbhar.blogspot.com
कृपया खालिल संकेतस्थळावर भेट द्या.
www.surbhisystems.in

3 comments:

  1. पाणी गरम करणाऱ्या उपकरणाची किंमत किती आहे
    घरातील लाईट चालवणारे उपकरन याची किंमत सांगा

    ReplyDelete